मनसेने लावले पोस्टर
राज्यात एकीकडे भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा राजकीय वाद रंगलेला असताना दुसरीकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात पोस्टरबाजी सुरू असल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे. आता मनसेच्या बॅनरमुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.
मनसेने मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवन तसेच शिवाजी पार्क परिसरात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून मजकूर लिहिला आहे. या मजकुरातून त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पोस्टरवर काय लिहिले आहे?
माननीय बाळासाहेब,
बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालताहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राज ठाकरे चालवत आहेत… जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या.
हे ही वाचा:
भाजपा स्थापना दिन; देशभरातून निघणार शोभायात्रा
‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’
आता आयएनएस विक्रांतसाठी संजय राऊतांचा आकांत
दरम्यान, शिवसेना भवनाच्या सुरक्षारक्षकांनी मनसेने लावलेले पोस्टर हटवले आहेत. शिवाजी पार्कवरील २ एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, “मशिदींवर एवढ्या मोठ्या आवाजात भोंगे का लावतात? मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार.” यावरून राज्यात आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती.