महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे न हटवल्यास मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. याद्वारे शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले आहे.
शिवसेना भवनासमोर भोंगे लावून शिवसेनालाच मनसे कार्यकर्त्यांनी डिवचले आहे. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले आहे. “ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं, त्यांना देखील जाग यावी हा हनुमान चालीसा लावण्याचा उद्देश आहे”, अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांनी यावेळी दिली आहे.
मात्र काही वेळातच पोलिसांनी मनसेकडून लावण्यात आलेला भोंगा जप्त करून यशवंत किल्लेदारांसह मनसैनिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनंतर मनसैनिकांनी थेट शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या खालीच हनुमान चालीसा पठण करण्यास सुरवात केली आहे.
हे ही वाचा:
अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले
नितीन गडकरी यांच्यानंतर, रावसाहेब दानवे गेले राज ठाकरेंच्या भेटीला
पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा
ठाण्यात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक
दरम्यान, शिवसेना भवनाच्या इथे मनसैनिकांनी एका टॅक्सीवर हा भोंगा लावून त्याचे तोंड शिवसेना भवनाकडे करून हनुमान चालीसा लावली होती. तसेच ज्या मंदिर, मंडळाला मनसेचा हा रथ हवा असेल तिथे तिथे तो फिरवला जाणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले होते. तसेच, आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी जसं सांगितलंय, की सगळे सण उत्साहात साजरे व्हायला हवेत. त्यामुळे विविध ठिकाणी आमच्या विभागात राम नवमीचा उत्सव साजरा होत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.