महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ तारखेपासून मशिदींच्या समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर सकाळपासून मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून भारतीय दंड विधान ३५३ अन्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता एका पोलीस अधिकारी यांनी वर्तवली आहे.
राज ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील निवासस्थानातून बाहेर पडलेले संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर देशपांडे यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत स्वतःच्या मोटारीतून पळ काढत असताना एक महिला पोलीस शिपाई यांना मोटारीचा धक्का लागून पडल्या व त्या जखमी झाल्या आहेत.
या दरम्यान, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी तेथून पोबारा केला. संदीप देशपांडे यांना १४९ ची नोटीस बजावून देखील त्यांनी नोटिसेचा भंग केला तसेच पोलीस त्यांना ताब्यात घेत असताना देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर
शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट
भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!
पोबारा केलेल्या संदीप देशपांडे यांच्याशोधासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे.
महाराष्ट्रात पहाटेपासून मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात झाली होती. पण काहीठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे तर काहीठिकाणी त्यांचे भोंगे ताब्यात घेतले गेले. महाराष्ट्रात काहीठिकाणी मशिदींमधून भोंग्यांवर अजान लावण्यातच आली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आवाहनाचा परिणाम जाणवू लागल्याचे चित्र आहे.