आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यावर

आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यावर

ट्विटरवर वापरलेली आक्षेपार्ह भाषा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चांगलीच भोवली आहे. ट्विटरवर एका नेटकाऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पण या साऱ्याचे खापर एका कार्यकर्त्याच्या माथी मारत या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न महापौरांनी केलेला दिसला. पण यावरूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी किशोरी पेडणेकरांना टोला लागवला आहे. ‘आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यावर’ असे म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.

बुधवार, २ जून रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची ट्विटरवर जीभ घसरली. ट्विटरवर एका नेटकाऱ्याच्या साध्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा संयम सुटला आणि थेट त्यांनी त्या तरुणाचा बाप काढला. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने मुंबईच्या ग्लोबल टेंडरशी संबंधित एक बातमी दिली होती. या बातमीवर व्यक्त होताना एका नेटकऱ्याने ‘कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले’ असा साधा प्रश्न विचारला. या प्रश्नाने महापौर किशोरी पेडणेकर पुरत्या संतापल्या. राग अनावर होऊन किशोरी पेडणेकर यांनी थेट ‘तुझ्या बापाला’ असे प्रत्युत्तर त्या तरुणाला दिले.

हे ही वाचा:

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

आम्ही आत्महत्या करायची का? कोविड योद्ध्याचा महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रोश

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

आज म्हणजेच गुरुवार, ३ जून रोजी किशोरी पेडणेकर यांनी या परकरणावर स्पष्टीकरण दिले असून या प्रकारात एका कार्यकर्त्याच्या माथी हा सारा दोष मारला आहे. “ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं” असे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

पण या उत्तरावरूनही मनसेने किशोरी पेडणेकरांना लक्ष्य केले आहे. या पुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

Exit mobile version