महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबत यांची पुण्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेशी दर्शवलेली असहमती वसंत मोरे यांना भोवली असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी गुढीपाडव्याच्या मिळाव्यात हिंदुत्वाचा हुंकार भरताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीवर जोरदार टिकास्त्र डागले. यावेळी त्यांनी मशिदीवरील अवैध भोंग्यांच्या प्रश्नांना हात घातला. त्याचवेळी स्पीकर वर हनुमान चालीसा लावा असे आवाहन देखील केले. त्यांच्या या आदेशानंतर विविध ठिकाणी मनसैनिक आक्रमक होताना दिसले. पण त्याच वेळी पुण्यातील वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला पटत नसल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा:
विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित
सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
यावरून वसंत मोरे राज ठाकरेंवर नाराज असल्याचे बोलले गेले. पण मोरे यांनी याबाबत खुलासा करताना मी माझे मत राज साहेबांकडे मांडेन अशी भूमिका बोलून दाखवले तर मी पक्षावर किंवा राज ठाकरेंवर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पण असे असले तरी देखील वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागात हनुमान चालीसा लावण्यास नकार दिला होता.
त्यानंतर गुरुवार, ७ एप्रिल रोजी सकाळी वसंत मोरे यांनी मनसेचा अधिकृत व्हाट्सअप ग्रुप सोडल्याचीही बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे मोरे यांच्यावर पक्षातून कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांना मिळाले असल्याची चर्चा होती. त्यानुसारच वसंत मोरे यांच्या जागी नवीन पुणे शहर अध्यक्ष म्हणून साईनाथ बाबर यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.