नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र

नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ प्रकल्पासारखा प्रकल्प गमावू नये असे आवाहन केले आहे. सुमारे ४ पानी या पत्रात नाणार प्रकल्पाबाबतची मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे.

हे ही वाच:

पश्चिम बंगालमध्ये आज मोदींची सभा

या पत्रातून आवाहन करताना राज ठाकरे यांनी, ‘परदेशी गुंतवणुक असलेला कोणताही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ देणं परवडणार नाही, अन्यथा महाराष्ट्राची ‘औद्योगिकीकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही ओळख पुसायला वेळ लागणार नाही’ असे मत देखील व्यक्त केले आहे.

त्याशिवाय ‘मला मान्य आहे की ह्या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे.’ असे सांगून राज ठाकरे यांनी ‘आज कोरोनानंतर (लॉकडाऊन नंतर) परिस्थिती बदलली आहे. लाखो तरूण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभं राहाण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पहायला हवं’ असं देखील म्हटले आहे.

याबरोबरच या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला होऊ शकणाऱ्या फायद्यांकडे देखील लक्ष वेधलं आहे. त्याबरोबरच विकासाचं नवं मॉडेल निर्माण करण्याचं आवाहन देखील केलं आहे. राज ठाकरे यांनी, सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास स्वतः आणि स्वतःचा पक्ष संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही दिले आहे. त्याबरोबरच ‘पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून लवकरच सरकारला सादर करू असेही त्यांनी सांगितले आहे.’

Exit mobile version