येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून म्हणजेच मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर, कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आमने-सामने उभे ठाकणार का असा सवाल उपस्थित झाला होता. अशातच आता मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मनसेचे नेते अभिजीत पानसे हे या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आमने-सामने येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.
हे ही वाचा:
संसद परिसरात बनावट आधार कार्ड वापरून घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!
जेडीयूचा ‘एक राष्ट्र, एक मतदान’ आणि समान नागरी कायद्याला पाठिंबा!
देवेंद्र फडणवीस हे कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलले. त्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आम्हाला उमेदवार लढवता येत नाही, याबाबत राज ठाकरे यांनी फडणवीसांना सांगितले. त्यावर फडणवीसांनी असे वारंवार घडणार नाही, असे आश्वासन दिले, अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली आहे.