आमदार सुहास कांदे यांचा सवाल
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यावेळीचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला.
एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली. मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला. नवाब मलिक आणि दाऊद यांचे संबंध असल्याचे समोर आले तरीही त्यांचा राजीनामा घेतला नाही. इतकं असूनही त्यांच्यासोबत सत्तेत सत्तेत बसायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
दरम्यान, बंडखोर आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांना निवेदन देणार आहेत. ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख निवेदनात असणार आहे. सुहास कांदे या दरम्यान आपले चार ते पाच हजार कार्यकर्त्यांसह मनमाडला जाणार आहेत.