कोरोनाच्या संकटकाळात रात्रंदिवस राबणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला शाबासकीची थाप नाहीच, पण शिव्यांची लाखोली वाहिली जात असेल तीही एका त्या विभागातील आमदाराकडून तर अशा अधिकाऱ्यांनी काम तरी कसे करावे? काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री रणजित कांबळे यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या नाचणगावात आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचणी शिबीर लावल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला असून जबाबदार लोकप्रतिनिधी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांच्याशी किती खालच्या पातळीवर येऊन बोलतात याचे हे उदाहरण आहे. डॉ. डवले यांनी कांबळे यांची यासंदर्भात वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही केली आहे. समीत ठक्कर यांनी आमदार कांबळे यांच्या या शिवीगाळीचा व धमक्यांचा ऑडिओ ट्विट केला आहे. त्यात डवले यांचे पत्रही ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
कोरोना बाधितांनी काय खावं? काय टाळावं? वाचा सविस्तर…
पश्चिम बंगालमधील परिस्थिती भयावह- राज्यपाल जगदीप धनकर
पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…
देवळीतील नाचणगावमध्ये हे चाचणी शिबीर लावण्यात आले होते. त्यासंदर्भात काँग्रेस आमदार कांबळे यांनी फोन करून डवले यांना धारेवर धरले. एकीकडे लॉकडाऊन असताना तुम्ही असे चाचणी शिबीर कसे लावू शकता? लोकांना बाहेर पडू नका म्हणून आवाहन करता आणि विभागातील आमदाराला न विचारता असे शिबीर कसे आयोजित करता? अशी भाषा वापरून नंतर कांबळे यांनी अक्षरशः शिवीगाळ करत त्या अधिकाऱ्याची मानहानी केली. डॉ. डवले हे अधिकारीही आमदार कांबळे यांच्या या फोनमुळे घाबरून गेले. आपण चौकशी करून कळवू असे त्यांनी सांगितले. कांबळे यांनी डवले यांना पोलिस स्टेशनमध्येही मारहाण करू अशी धमकीही दिली.
डवले यांनी त्यांना सांगितले की, जिथे रुग्णसंख्या जास्त आहे आणि धोका जास्त आहे, तिथे या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यावर कांबळे त्यांना म्हणाले की आमच्या निर्वाचन क्षेत्रात अशा चाचण्या करताना आम्हाला सांगत नाहीत. लॉकडाउनमध्ये कसं काय सुरू केलं? राजकारण करता काय आमच्याशी? काय समजता तुम्ही. तुम्हाला चपलेने मारणार.
या सगळ्या प्रकारानंतर डॉ. डवले यांनी जिल्हाधिकारी, वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक वर्धा यांना पत्र लिहून झाल्या प्रकाराची तक्रार केली. आमदार कांबळे यांनी दिलेल्या शिव्याही त्यांनी पत्रात नमूद केल्या आहेत. काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या चाचणी केंद्रावर येऊन या शिबिराची छायाचित्रे काढली आणि व्हायरल केली. त्यानंतर आमदार कांबळे खवळले आणि त्यांनी डॉ. डवले यांना फोन करून धमकी दिली.
करोनाच्या संकटकाळात २४ तास सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरणारा हा प्रकार आहे, असे डॉ. डवले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आ. कांबळे यांच्याविरोधात कलम २९४, ३५३, ५०६, ३३२, ३३३, १८८, ५०४, ६५ (ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणीही डवले यांनी केली आहे. मंगळवारपर्यंत कारवाई झाली नाही तर कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे ही तक्रार डॉ. डवले यांनी केली आहे.
Dr Ajay Davle DHO ZP Wardha has lodged offical complaint against 5 Term Sitting @INCIndia MLA & Former Health MOS Maharashtra Ranjit Kamble.
Shame On You @RahulGandhi pic.twitter.com/zeSRuR72CK
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) May 10, 2021
आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना धमक्या देण्याचे हे कोणते मॉडेल महाराष्ट्रात सुरू झाले आहे, असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत.