विधिमंडळ अधिवेशनाच्या सातव्या दिवशी भाजपा-शिवसेना युती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चकमक झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा शिवसेना युतीच्या आमदारांचे आंदोलन सुरू असताना अमोल मिटकरी व राष्ट्रवादीचे आमदार तिथे आले आणि त्यांनीही घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यातून दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरून महेश शिंदे यांनी मिटकरी यांच्यावर घणाघातील टीका केली आहे.
शिंदे म्हणाले की, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक घोषणा देत आहेत, चिथावणी देत आहेत. सातत्याने घोषणा देत आहे. आम्ही आमदार एकत्र येऊन शांततेत आंदोलन करत होतो. घोषणा देत होतो. पण पाठीमागून काही विधिमंडळ सदस्य पुढे आले आणि आमच्या आंदोलनात हस्तक्षेप केला. गाजरं आणली, धक्काबुक्की केली, अर्वाच्य भाषा वापरली. विधिमंडळाच्या परिसरात असे कृत्य अशोभनीय आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. जो गैरकारभार विरोधकांनी केला त्याचा पर्दाफाश त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला.
शिंदे यांनी सांगितले की, अमोल मिटकरी यांच्याबद्दल अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे. त्यांचे वर्तन सगळ्यांनी पाहिले आहे. आम्ही शांतपणे आलो होतो. पण त्यांनी धक्काबुक्की केली. मिटकरी यांनी ढकलले. मग पुढील गोष्टी झाल्या. खरे तर मिटकरी हे लोकशाहीवादी विचारांचा नेता नाही. त्यांचे चुकीचे व जहाल विचार आहेत. वरिष्ठांना विनंती आहे की अशा लोकांवर कारवाई करा.
हे ही वाचा:
नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक
“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात
दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या
लवासाचे खोके, बारामती ओके हे त्यांना लागलेले आहे. सत्य कटू वाटतं सत्य पचवणं अवघड झालं आहे. आमचे प्रतोद भरत गोगावले यांनी निर्णय केला. ज्यांनी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला त्याविरोधात आम्ही दाद मागणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.