सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र या प्रकरणाची सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ असून याआधी तीन वेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी ३ ऑक्टोबर, मग ६ ऑक्टोबर आणि त्यानंतर आता ९ ऑक्टोबरला होणार होती. मात्र आता थेट ३ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मग ६ ऑक्टोबर, त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे ठरले होते. मात्र, आता ९ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.