शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभे राहात आहे मात्र या स्मारकात फक्त शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले जातील, शिवसेनेचे नाव घेऊन तोतयेगिरी करणाऱ्यांना तिथे स्थान नाही, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकात मनमानी करायची असेल द्वेषाचा खासगी एजेंडा रेटायचा असेल तर उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करून स्मारकाचा खर्च करावा. जनता लोकवर्गणी काढून शिवसेनाप्रमुखांचे उचित स्मारक उभारेल. जनतेच्या पैशावर कुणाचा फुकटचा तोरा नको. शिवाय, शिवसेनेचा मुखवटा लावून काँग्रेसचा अजेंडा रेटणाऱ्यांकडे स्मारकाचा ताबा नको.
हे स्मारक तिथे असलेल्या महापौर बंगल्याच्या जागेवर उभे राहात आहे. त्याचा आराखडा कसा असेल याविषयी उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. तसेच या आराखड्याविषयीचे सादरीकरणही पत्रकार परिषदेत झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त विधान करताना म्हटले होते की, स्मारकात फक्त शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील. शिवसेनेचे नाव घेऊन तोतयेगिरी करणाऱ्यांना तिथे स्थान नसेल. या वाक्यातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला होता. पण आमदार अतुल भातखळकर यांनी ही जमीन आणि या स्मारकासाठी लागणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याची आठवण करून दिली आहे.
हे ही वाचा:
लटके आघाडीवर आणि नोटा दुसऱ्या क्रमांकावर
सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत
दाऊदसह पाच जणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केले आरोपपत्र
मुंबई हायकोर्ट जाणार वांद्रयाला
अतुल भातखळकर यांनी अशीही घणाघाती टीका केली आहे की, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक सरकारी जमिनीवर आणि सरकारचे शेकडो कोटी रुपये खर्च करून होणार आहे, त्याचा ताबा शिवसेनेचा मुखवटा लावून congress चा एजेंडा राबवणाऱ्या लोकांकडे जावू नये, यासाठी स्मारक ट्रस्टची नव्याने रचना करावी. अन्यथा इथे रात्री सीसीटीव्ही बंद करून फिल्मी पार्ट्या होतील.