काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेल्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी सावरकरांचा अपमान केला असे म्हटल्यामुळे चतुर्वेदी यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या संपूर्ण घटनेवरच प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा प्रियांका चतुर्वेदींवर घणाघात केला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी एक काय अशा दहा दहा नोटिसा आणि खटले अंगावर घेऊ’ असा पलटवार भातखळकर यांनी केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ऑगस्ट महिन्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला होता. या बेशिस्त वर्तणुकीसाठी गोंधळ घालणाऱ्या १२ सर्वपक्षीय खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. या बारा खासदारांना संसदेची माफी मागण्याच्या संदर्भात प्रस्ताव ठेवला असताना माफी मागायला आम्ही सावरकर नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यावरूनच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका केली होती. पण मी सावरकरांचा कोणताही अपमान केला नाही असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपा नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
हे ही वाचा:
मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार
या नोटिसीवरूनच पलटवार करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी चतुर्वेदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ट्विटरवर त्यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांचा अपमान केला असे आम्ही म्हणाल्यामुळे आम्हाला जी कायदेशीर नोटीस दिली आहे त्याचं कायदेशीर उत्तर आम्ही जरूर न्यायालयात देऊ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी एक काय अशा दहा दहा नोटिसा आणि खटले अंगावर घेऊ एवढे सावरकर आमच्या दृष्टीने महान आहेत. सावरकर यांच्या संदर्भातल्या भूमिका कोणी बदलल्या आणि कशा बदलल्या हे अम्ही जनतेत मांडत आहोत आणि येणाऱ्या काळात अन्य व्यासपीठांवरून मांडू. ‘मी सावरकर यांच्या विषयी असं काही चुकीचं बोललेच नाही.’ हे त्यांनी म्हणणे हाच आमचा पहिला विजय आहे.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
चतुर्वेदीबाईंना सडेतोड उत्तर देऊ… pic.twitter.com/CSSLzfNmcl
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 8, 2021