अबू आझमीच्या बोलवित्या धन्याची चौकशी करा!

अबू आझमीच्या बोलवित्या धन्याची चौकशी करा!

घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे” अशी चिथावणीखोर भाषा वापरणारे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांची दिल्ली हिंसाचार प्रकरणात चौकशी व्हावी आणि त्यांचा बोलविता धनी शोधून काढावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आमदार भातखळकरांनी ही मागणी केली आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा २५ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात आला होता. या मोर्च्याच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील काँग्रेस,राष्ट्रवादी,कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी भाषणे केली. यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचेही भाषण झाले. आझमी यांचे भाषण हे अतिशय प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि मोर्चेकऱ्यांना चिथावणी देणारे होते. ‘मोदीजी तुम्हे यह हवा जलाकर राख कर देगी’ ‘मोदीजी तुम खतम हो जाओगे’ अशी भाषा आझमी यांच्या भाषणात वापरण्यात आली होती.

“२५ जानेवारी रोजी आझमी यांनी शेतकरी मोर्च्याच्या व्यासपीठावरून राजकीय भाषण करताना लोकांना भडकवण्याचे काम केले. अबू आझमी यांच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी २६ जानेवारी रोजी राजधानीत शेतकरी आंदोलनाच्या बहाण्याने हिंसाचार झाला आणि लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावण्यासारख्या देशविरोधी घटना घडल्या.” त्यामुळे या प्रकरणात अबू आझमी यांची चौकशी करून आंदोलनामागचे खरे ‘मास्टरमाईंड’ कोण याचा तपास व्हावा अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Exit mobile version