ऑक्सिजन प्लँटसंदर्भात आमदार अमित साटम यांनी विचारला सवाल
ज्याच्यावर ताशेरे ओढण्यात आले, गुन्हा दाखल झाला त्याच हायवे कन्स्ट्रक्शनला ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे काम का देण्यात आले, ही कोणती ‘पेंग्विन गँग’ पालिकेत वाझेगिरी आणि भ्रष्टाचार करत आहे, असा खरमरीत सवाल भाजपाचे आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या या संसर्गाच्या काळात मुंबईकरांची ऑक्सिजनची गरज लक्षात घेता १६ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पण मुंबई महानगरपालिकेने ज्या कंत्राटदाराला हे काम सोपविले आहे त्यांच्याकडून ते वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यावर आमदार साटम यांनी आक्षेप नोंदविला आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली
कुख्यात गँगस्टर बचकानाला ठोकल्या बेड्या
मुंबईकरांच्या जीवाशी खेळलात, आता पाण्याशी खेळ नको!
शिवाजी पार्कात अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरली
आमदार साटम यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने हायवे कन्स्ट्रक्शनला ८४ कोटींचे कंत्राट दिले आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लँटचे हे काम आहे. मुंबई शहरात १६ ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमधील प्लँटचे काम ३० दिवसांत पूर्ण करण्याचे पालिकेच्या होकारपत्रात नमूद करण्यात आले आहे. ३२ दिवस पूर्ण झालेले असतानाही काम मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही. आधी ८४ कोटींचे काम पूर्ण झालेले नसताना नवे ३२० कोटींचे काम हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यानेच हा प्रश्न उपस्थित केला आहे.
साटम यांनी पुढे म्हटले आहे की, पेंग्विनचे राणीच्या बागेतले एनक्लोजर बनविण्यावरून ज्या कंत्राटदारावर ताशेरे ओढले गेले, गुन्हा नोंदविला गेला. अशा हायवे कन्स्ट्रशनला पुन्हा काम देण्यात आले. आधीचे काम पूर्ण न करता नवे ३२० कोटीचे काम सोपविल्यामुळे ही कोणती पेंग्विन गँग महानगरपालिकेत वाझेगिरी भ्रष्टाचार करत आहे? माझी आयुक्तांना विनंती आहे, कंत्राट रद्द करावे आणि हायवे कन्स्ट्रक्शनवर एफआयर नोंदवावे. तसेच ३२० कोटींचे जे नवे काम दिले आहे तेदेखील काम रद्द करावे.
हायवे कन्स्ट्रक्शनला हे काम ८३ कोटी ८३ लाख ५ हजार ७०६ इतक्या रकमेचे देण्यात आले आहे. याच कंत्राटासंदर्भात आमदार साटम यांनी आक्षेप नोंदविले आहेत.