अमित साटम यांनी दिला इशारा
रस्त्याचे नाव टिपू सुलतानच्या नावावरून ठेवण्यासाठी आपण कोणतेही अनुमोदन दिलेले नाही आणि आपण तसा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नव्हता, असे स्पष्टीकरण भाजपाचे आमदार अमित साटम यांनी दिले आहे. जर अनुमोदन दिल्याचा अथवा प्रस्ताव दिल्याचा कोणताही पुरावा असेल तर तो महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सादर करावा. अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल, असा इशाराही साटम यांनी दिला आहे.
मालाडमधील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून बुधवारी मुंबईत भाजपाने तीव्र आंदोलन केले. त्यावेळी पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यासाठी एका नगरसेवकाने अनुमोदन दिले होते आणि तसा प्रस्तावही दिला होता, असा आरोप केला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांचे नाव घेत त्यांनीच रस्त्याला नाव देण्यासाठी प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले. पण साटम यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
त्यावर अमित साटम यांनी म्हटले आहे की, मी असे कोणतेही अनुमोदन दिलेले नाही किंवा मी असा कोणताही प्रस्ताव नगरसेवक असताना दिलेला नाही. नगरसेवक असताना मी स्थापत्य समितीचा सदस्यही नव्हतो. मी प्रस्ताव दिल्याचा किंवा पत्र दिल्याचा पुरावा महापौर पेडणेकर आणि अस्लम शेख यांनी सादर करावा किंवा अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी सज्ज राहावे.
हे ही वाचा:
आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा
‘ राफेल ‘ची पहिली महिला पायलट शिवांगी…
श्रीनगरच्या लालचौकातील घंटाघरावर प्रथमच फडकला भारतीय तिरंगा
साटम यांनी अशी मागणीही केली आहे की, माझा अस्लम शेख यांना सवाल आहे की, जेव्हा लॉकडाऊन होता, सर्व धार्मिक स्थळेही बंद होती तेव्हा या कॉर्डिलिया क्रूझला अस्लम शेख यांनी परवानगी कशी दिली याचे स्पष्टीकरण द्यावे. मुंबई बॉम्बस्फोटात ज्याचा सहभाग होता, त्या याकुब मेमनवर दया दाखवून त्याला फाशी देऊ नये यासाठी ज्या पत्रावर आपण सही केली त्याचे आधी स्पष्टीकरण आपण द्यावे. कॉर्डिलिया क्रूझला परवानगी का दिली, याकुब मेमनला फाशी देऊ नये यासाठी आपण सही का दिली, हा माझा सवाल आहे, असे साटम यांनी म्हटले आहे.
बुधवारी उद्यानाला टिपूचे नाव देण्यावरून भाजपा, बजरंग दल यांनी मालाडमध्ये आंदोलन केले. त्यानंतर भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.