प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी आज कोलकाता येथे भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
भाजपाचे सरसचिव कैलाश विजवर्गीय, पार्टीचे उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि सुवेंदु अधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते. चक्रवर्ती हे यापूर्वी तृणमूल काँग्रेसकडून दोन वर्षांसाठी राज्यसभा सभासद राहिले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या अखेरपासून विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपात दाखल झाले आहेत. यात, राज्यसभा सभासद असलेल्या दिनेश त्रिवेदी यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
बंगालमधील निवडणुकांना २७ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. २९ एप्रिल रोजी मतदानाची सांगता होईल, तर २ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीसाठी तृणमुल काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच ब्रिगेड परेड ग्राऊंडवर विशाल सभा होणार आहे.