‘तांडव’ ला केंद्र सरकारचे समन्स

‘तांडव’ ला केंद्र सरकारचे समन्स

ॲमेझोन प्राईमच्या ‘तांडव’ या वेब सिरिज विरोधात देशभर तांडव सुरू असताना केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयातर्फे ॲमेझोन प्राईमच्या प्रतिनिधींना समन्स पाठवून ‘तांडव’ मधील आक्षेपार्ह दृष्य आणि संवादांबद्दल स्पष्टीकरण मागीतले आहे. ‘तांडव’ या वेब सिरिज मधील काही दृष्ये आणि संवाद हे धार्मिक आणि जातीय भावना दुखावणारे असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

सैफ अली खान यांची मुख्य भुमिका असणारी तांडव ही वेब सिरिज १५ जानेवारी रोजी ॲमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाली. पण या सिरिजमधील काही आक्षेपार्ह दृष्य आणि संवादांमुळे या सिरिज विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात भाजपा आमदार राम कदम यांनी या वेब सिरीज विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहले होते. ओटीटी प्लॅटफॉर्म साठीही परिक्षण महामंडळांसारखी काहीतरी व्यवस्था असावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी या पत्राद्वारे केली होती.

मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी देखील केंद्रिय मंत्री जावडेकरांना पत्र लिहून अशाच प्रकारची मागणी केली होती. तर भाजपा खासदार मनोज कोटक यांनीदेखील प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ओटीटी प्लॅटफाॅर्म्ससाठी परिक्षण मंडळाची आवश्यकता असल्याचे मत मांडले होते. देशातील विवीध भागातून होणाऱ्या या आक्रोशाची दखल घेत माहिती प्रसारण मंत्रालयाने पाऊले उचलली आहेत.

दिग्दर्शकाचा माफिनामा…
देशभरात ‘तांडव’ विरोधी वातावरण निर्माण झाले असतानाच या वेब सिरिजचे दिग्दर्शक अली अब्बाज जफर यांनी ट्विटरवरून माफिनामा सादर केला आहे. “आम्ही ‘तांडव’ बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया पहात आहोत. आज माहिती प्रसारण मंत्रालयानेही आम्हाला सांगीतले की सिरीज मधील विविध आक्षेपार्ह बाबींमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याच्या तक्रारी येत आहेत.” असे जफर यांनी म्हटले आहे. आमचा जनभावना दुखावण्याचा हेतू नसून आम्ही नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असे म्हणत जफर यांनी माफी मागीतली आहे.

Exit mobile version