केंद्र सरकार आणि विरोधक बुधवारी राज्यसभेत सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षावरून आमनेसामने आले. काँग्रेसच्या आरोपांनंतर आठ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, देशातील जनता त्यांच्याशी संबंधित विषय सभागृहात उपस्थित होण्याची वाट पाहत आहे, तर रस्त्यापासून संसदेपर्यंत विरोधकांचा एकमेव अजेंडा केवळ अराजकताच होता. राज्यसभेतील गोंधळावर ८ केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली असताना, अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, नक्राश्रू ढाळण्याऐवजी विरोधकांनी देशाची माफी मागावी.
त्याच वेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेचे कामकाज चालू न देण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यांनी कोणत्याही महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चाही केली नाही. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांना पावसाळी अधिवेशन चालूच द्यायचे नव्हते असे जोशी यांनी मत व्यक्त केले. अधिक बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षाला साडेसात वर्षानंतरही पराभव पचनी पडलेला नाही. देशावर एका घराण्यालाच केवळ राज्य करायचे आहे.
राज्यसभा अध्यक्षांनी नियम मोडणाऱ्या विरोधी खासदारांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. विरोधी सदस्य खुर्चीसमोर आले आणि सरकारविरोधी घोषणाबाजी करू लागले. तथापि, या सदस्यांना सुमारे ५० सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या कॉर्डनद्वारे अधिकाऱ्यांच्या डेस्क आणि प्लिंथवर पोहोचण्यापासून रोखले गेले.
हे ही वाचा:
ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी
भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल
सौर उर्जा निर्मितीमध्ये भारताचे शतक!!
या सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती अशा प्रकारे करण्यात आली होती की, ज्यामध्ये पुरुष सुरक्षा कर्मचारी विरोध करणाऱ्या महिला खासदारांसमोर उभे होते आणि महिला सुरक्षा कर्मचारी पुरुष खासदारांसमोर उभे होते. गोंधळ घालणारे जे कुणी होते त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे. जोशी आदी मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही हीच मागणी करण्यात आली.