कॉंग्रेसशासित राजस्थान सरकार मधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. शनिवार, २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्त करण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा जोर धरत असतानाच सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे राजस्थान सरकार मध्ये आता काय नवे पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयपूर येथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवास्थानी राजस्थान मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पार पडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी सात वाजता गेहलोत सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आहेत. रविवार, २१ नोव्हेंबर रोजी या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडेल तर यानंतर दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असे सांगण्यात येत आहे.
शनिवारी सुरुवातीला काँग्रेसच्या तीन मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. यामध्ये आरोग्यमंत्री रघु शर्मा, महसूल मंत्री हरीश चौधरी आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांचा समावेश आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाची बैठक पार पडून इतर मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळ शपथ विधीसह काँग्रेस पक्षातील नव्या चेहऱ्यांना सरकारमध्ये मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!
३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल
घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले
‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’
राजस्थान सरकार मधील अंतर्गत संघर्ष कधीच लपून राहिला नाही. उपमुख्यमंत्री असलेल्या सचिन पायलट यांनी अनेकदा अशी मागणी केली आहे की काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना ज्या नेत्यांनी पक्षाच्या विजयासाठी मेहनत घेतली, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे. त्यामुळे आता या विस्तारात नव्या चेहर्यांना संधी देऊन निष्ठावंताना योग्य तो परतावा दिला जाणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी काँग्रेसचे प्रभारी अजय माकन हे राजस्थानमधील जयपूर येथे दाखल झाले आहेत.