महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संदर्भात ईडीने त्यांच्यावर दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी करत त्यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यालाही समन्स बजावले होते. यापूर्वी एजन्सीने मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांनाही समन्स बजावले होते.
मलिक यांना २३ फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नबाब मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टाने मलिकांना कोठडीत ठेवण्याचा आदेश अधिकार क्षेत्राशिवाय दिला, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात
ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक
याआधी फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला होता. सूत्रांनी सांगितले की, अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या मुंबईतील अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले. दरम्यान, भाजपने राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांचे समर्थन करत आहे.