मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा

अमित शहांना शुभेच्छा दिल्यावरून मिळाली हवा

मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विविध स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या शुभेच्छांमध्ये शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शुभेच्छांची चर्चा अधिक होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मिलिंद नार्वेकर सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे बीसीसीआयचे सचिव झाल्यानंतर त्यांनाही नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेत नाराज आहे, असे वक्तव्य भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही केले होते. त्यामुळे याची अधिक चर्चा होत आहे.

राजकारणात काय होईल, हे सांगता येणे कुणालाही शक्य नसते. दीपोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनीही ही युती आहे तर जाहीर करा अशी मागणी केली होती. आता नार्वेकर यांनी अमित शहांना शुभेच्छा देणारे ट्विट केल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा:

आज देशभरात होणार रोजगाराची आतषबाजी

नोटेवर गांधी ऐवजी हवा “यांचा” फोटो

‘हिंदू पंडितांना हुसकावण्यात आल्याने काश्मीरमधील शिक्षण व्यवस्था कोलमडली’

राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकर भरती करणार

मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले होते. त्यावरूनही चर्चा सुरू झाली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार बाहेर पडल्यावर गुजरातला त्यांचे मन वळविण्यासाठी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर गेले होते. अर्थात, त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. मात्र नार्वेकरांबाबत चर्चा सुरू झाली होती. एकूणच एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांचे सूर जुळतात हे स्पष्ट झालेले आहे.

तिकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मात्र शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडत असतात. त्यामुळे नार्वेकर हे नेमके आहेत कुणाच्या बाजूने हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या यासंदर्भातील प्रतिक्रियाही कुठे आलेली नाही. शिवाय, त्यांनी एकदाही शिंदे व त्यांच्यासोबतच्या आमदारांवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. एकूणच हे सगळे गोलमाल आहे हे स्पष्ट आहे.

 

Exit mobile version