५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दिली माहिती

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती यानंतर त्यांची भारत न्याय यात्रा रविवार, १४ जानेवारीपासून मणिपूर येथून सुरू होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसला जबरदस्त मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये मिलिंद देवरा म्हणाले, “आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे. इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”

माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार राहिले आहेत आणि आताही ते याचं मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा होती. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिलींद देवरा यांच्यासह १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता जातील असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

देशातील बहुतांश मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने

मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!

‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित

मिलिंद देवरा २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचे वजन आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतही हालचालींना वेग आल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधी यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version