काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून गेलेल्या देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन देवरांनी गणरायाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी देवरा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
मिलिंद देवरा म्हणाले की, “मी खूप भावूक झालो आहे. मी काँग्रेस सोडेन, असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासोबत ५५ वर्षांचे जुने नाते होते. परंतु, आज हे नातं मी संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासात्मक राहिलेलं आहे. माझी विचारधार मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील सर्वसामान्यांची सेवा करण्याची आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असणारे नेते आहेत. तसेच ते जमिनीवरचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या वेदना त्यांना माहिती आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे मोठं व्हिजन आहे. त्यामुळेच आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडेही देशासाठी मोठं व्हिजन आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. बाळासाहेब माझ्या वडिलांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझं आणि शिवसेनेचं नातं जवळचं आहे. शिवसेनेमुळे माझे वडील मुंबईचे महापौर झाले होते. शिंदेंना मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी चांगले लोक हवे आहेत,” असं म्हणत देवरा यांनी एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली.
हिऱ्याच्या मार्केटपासून ते कपड्याच्या मार्केटपर्यंत सगळे लोक आपल्यासोबत आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी हे सगळे आपल्यासोबत आलेले आहेत. केंद्रात आणि राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात यशस्वी पंतप्रधान बसलेले आहेत. महाराष्ट्रालाही सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे. वर्षा बंगल्याला मी एवढं एक्सेसेबल कधीच बघितलं नव्हतं. मागच्या दहा वर्षांमध्ये मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, ही भाजपाची उपलब्धी आहे. सक्षम नेतृत्वामुळे देश वेगळ्या उंचीवर पोहोचू शकतो,” असंही मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा..
लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर
वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?
आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा
“मी पक्षाच्या सर्वात संकटाच्या काळात उभा राहिलो होतो. जर पक्षाने आमच्यातील योग्यता ओळखली असती तर आज ही वेळ आली नसती. नरेंद्र मोदी जे करतील त्याच्या विरोधात बोलण्याचं काम काँग्रेस करत आहे. उद्या मोदीजी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष आहे. तर त्याचाही काँग्रेसचे नेते विरोध करतील,” असा टोला देवरा यांनी काँग्रेसला लागावला आहे.