भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी मोठे विधान केले आहे. “मला राज्यपाल होण्यात काडीचाही रस नाही. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास केरळचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल.” असे विधान श्रीधरन यांनी केले आहे. श्रीधरन हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यापूर्वीच त्यांनी हे मोठे विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यावर आणि आधारभूत संरचना विकसित करण्यावर आपला भर असेल. “केरळात भाजची सत्ता यावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच मी राजकीय आखाड्यात उतरत आहेत. राज्याच्या हितासाठी मी काम करणार आहे.” असे श्रीधरन यांनी सांगितले.
ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. त्यांना ५८ वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहे. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाते.
ई.श्रीधरन यांना भारत सरकारने त्यांच्या कामासाठी २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारने देखील श्रीधरन यांना २००५ मध्ये पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे. तर जपानने त्यांना २०१३ मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे.
“जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा व्हायची. मी त्यांचा आदर करतो. भाजपमध्ये प्रवेश करण्याचं तेही एक कारण आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद सांभाळायला मी तयार आहे. मला राज्यपाल होण्यात रस नाही. ज्यांच्याकडे काहीच अधिकार नसतो अशा प्रकारच्या संवैधानिक पदावर राहून राज्याच्या विकासासाठी योगदान देता येणार नाही.” असेही ते म्हणाले.