उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईतील बहुचर्चित मेट्रो-३ चे कारशेड पुन्हा आरेतच बांधण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.
बहुचर्चित कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ चे कारशेड हे आरे वसाहतीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दणका दिला. मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे.
राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. दरम्यान, अनेक झाडी तोडावी लागणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. पुढे २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता.
त्यानंतर या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला. उद्धव ठाकरे यांनी आरेमधील तर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार
सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!
मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष
एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!
मात्र, राज्यात सत्तांतर होताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.