१० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिन पार पडला. तर ११ जून रोजी राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असणारे प्रशांत किशोर हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीमुळे राजकीय चर्चांना ऊत आला नसता तरच नवल होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी असताना शरद पवारांनी कंबर कसली आहे का? या चर्चांना सुरुवात झाली. ती चर्चा होणे अपेक्षित होते आणि त्यापुढे जाऊन सांगायचे तर स्वतः शरद पवारांना ते हवे असण्याची शक्यता खूप जास्त आहे.
राज्यात पुरेशी संघटनात्मक ताकद नसताना, दिल्लीत लोकसभेत आणि राज्यसभेत अपेक्षित संख्याबळ हाताशी नसताना, केंद्रीय पातळीवर आपल्या प्रतिमेचा निर्माण केलेला फुगा टिकवून ठेवणे पवारांसाठी गरजेचे आहे. त्यासाठी विविध कारणांनी अशी हवा तयार करणे हा पवारांच्या राजकारणाचा भाग आहे. किंबहुना ही त्यांच्या राजकारणाची गरज आहे. त्यामुळे अशी हवा तयार करण्यासाठी अधूनमधून ते काही गोष्टी करत असतात. त्याने माध्यमांना चघळायला विषय मिळतो आणि पवारांना आत्मिक समाधान!
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक हे सारेच या भेटीबद्दल मत व्यक्त करताना दिसत आहेत. पण या सर्वांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी व्यक्त केलेले मत अतिशय योग्य वाटते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट राजकीय स्वरूपाची नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांचे हे म्हणणे खरेच मानावे लागेल. कारण ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोकशाहीच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य असलेले शरद पवार हे आता नव्या दमाच्या लोकांना संधी देतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण आपल्या समोर आहेच. युवा पार्थ पवार यांना संधी देण्यासाठी शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. आता ही माघार पराभवाच्या भीतीने घेतली असे टीकाकार म्हणत असले तरी त्यात काही तथ्य नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांना शरद पवारांना पाठिंबा दिला. या उदाहरणातून आपल्या लक्षात येते की पवारांचे मन आता राजकारणातून उडून गेले आहे.
हे ही वाचा:
आमदार अतुल भातखळकर करणार ‘मुंबई मॉडेल’ची पोलखोल
तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी
संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये
स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर, आपण आता राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या बाबी लक्षात घेता पवार आणि किशोर यांची भेट ही राजकीय स्वरूपाची नाही हे स्पष्टच होते. पण मग ही भेट नेमकी झाली कशासाठी? हा प्रश्न उद्भवतोच!
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचे वर्णन करायचे झाले तर प्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगूळकर यांनी त्यांच्या अजरामर गीतामध्ये लिहिलेली एक ओळ चपखल बसते. ती ओळ म्हणजे ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट’! ओंडके हे रूपाने, आकाराने, वजनाने एकमेकांपेक्षा भिन्न जरी असले तरीही त्यांच्यातले गुणधर्म मात्र सारखे असतात. हीच गोष्ट आपल्याला पवार आणि किशोर यांच्या बाबतीत दिसून येते. एक राजकारणी म्हणून शरद पवार यांचा प्रवास आणि एक राजकीय रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचा प्रवास एकसारखाच आहे.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द त्यांनी मारलेल्या कोलांट्याउड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पवारांनी आपली राजकीय वाटचाल काँग्रेस सोबत सुरू केली. काँग्रेसमुळे पवार नावारूपाला आले. पण नंतर त्याच काँग्रेस विरोधात शरद पवारांनी मोर्चा उघडला. तीच गोष्ट प्रशांत किशोर यांच्या बाबतीतही दिसते २०१२ ची गुजरात विधानसभा निवडणूक आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक यात प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींसोबत काम केले. त्या यशामुळेच प्रशांत किशोर हे खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. पण कालांतराने किशोर यांनी मोदींविरोधातच मोर्चा उघडला.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातले साम्य हे इथपर्यंत सीमित नाही. २०१८ साली हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एक लीडरशिप समिट पार पडले. या समिटमध्ये प्रशांत किशोर हे वक्ते म्हणून आले होते. यावेळी किशोर यांनी राजकीय पक्षांसाठी करत असलेल्या इलेक्शन कॅम्पेनमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण कोणत्याच राजकीय पक्षांसोबत काम करणार नसल्याचे किशोर यांनी सांगितले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी आपले पॉलिटिकल कॅम्पेनिंगचे काम सुरूच ठेवले. हीच गोष्ट शरद पवार यांच्या बाबतीतही आपल्याला दिसते. शरद पवार यांनीही आपण यापुढे कधीही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. त्यानंतर ते राज्यसभेवर निवडून गेले होते. पण तरीही २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवार यांनी ‘पक्षाच्या आग्रहामुळे’ मी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी माढा हा मतदारसंघ निश्चित केला होता. पण एकूणच राजकीय हवेचा अंदाज घेत पवारांनी तिथून माघार घेतली आणि मावळ या मतदारसंघातून पार्थ पवार यांना रिंगणात उतरवले.
हैदराबादच्या त्याच लीडरशिप समिटमध्ये प्रशांत किशोर यांनी आणखीन एक गौप्यस्फोट केला. २०१७ साली पंजाब विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने न बोलवताच किशोर आणि त्यांची टीम पंजाबमध्ये दाखल झाली. कारण त्यांना सिद्ध करायचे होते की त्यांची आयपॅक ही संस्था आम आदमी पक्षापेक्षा चांगली निवडणुक रणनिती आखू शकते. हे असे न बोलावता धावून जाणे हा देखील पवारांचाच गुण! २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पवार यांनी न मागता दिलेला पाठिंबा हा साऱ्या देशाने पाहिला.
त्यामुळे अशा समस्वभावी दोघांची झालेली भेट ही राजकीय असूच शकत नाही. त्यात राजकारण शोधणेही व्यर्थ आहे. प्रवाहासोबत या दोघांचा एकाच दिशेने काही काळ प्रवास झाला तरीही नवल वाटण्याचे कारण नाही. पण ग.दी माडगूळकर यांनी गीताच्या पुढच्या ओळीत दिलेला एक इशारा मात्र महत्वाचा आहे. ‘एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ’. त्यामुळे भेटलेल्या या दोन ओंडक्यांना वेगळं करणारी कोणती ‘लाट’ येते हे येणारा काळंच ठरवेल.
– स्वानंद गांगल
(मुख्य उपसंपादक, न्यूज डंका)