महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कोर्टाने जामिनावर सोडले आहे. मुंबईतील माझगाव मजिस्ट्रेट कोर्टाने मलिक यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मुक्त केले आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने मलिकांना जामीन देत दिलासा दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात पत्रकार परिषदांचा धडाका लावत आरोपांच्या फैरी झाडणारे नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांचे नाव घेऊन आरोप केले होते. हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले होते.
नवाब मलिक यांच्या वर मानहानीचा फौजदारी खटला दाखल करताना भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती. या प्रकरणात सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांना माझगाव येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने समन्स बजावले होते.
त्यानुसार नवाब मलिक हे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी माझगाव येथील न्यायालयात हजर राहिले होते. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने नवाब मलिक यांना पंधरा हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन दिला असून त्यांना पाच हजार रुपये रोख भरण्यास सांगितले. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.