मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आज (१० डिसेंबर) धमकीचे पत्र मिळाल्याचे समोर आले आहे. या पत्रामध्ये अत्यंत अश्लील भाषा असून कुटुंबियांना मारून टाकू असे या पत्रात म्हटले आहे. कुरिअर द्वारे हे पत्र आले असून पनवेल पोस्टचा पत्ता पत्रावर आहे.
महापौर यांना मिळालेल्या पत्रात थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच कुटुंबियांना, मुलांना मारून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. पत्रात ‘माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका,’ असा इशाराही देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअर द्वारे आलेले असून पत्राच्या पाकिटावर वेगळ्या व्यक्तीचे नाव आहे तर, पत्रात वेगळ्या व्यक्तीचे नाव आहे. खारगर, पनवेल आणि उरण अशा ठिकाणांचाही या पत्रात उल्लेख आहे.
पत्राबद्दल किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही ९’शी संवाद साधला तेव्हा त्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी संरक्षण मागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या पत्राचा आणि भाजप सोबत सुरू असलेल्या प्रकरणाचा काहीही संबंध नसून तो वेगळा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या विरोधात एफआयआर दाखल करा
सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव दिल्लीत दाखल
महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!
महापौरांना मिळालेल्या पत्राबाबत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही ‘टीव्ही ९’ला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही या पत्राचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, मुंबईच्या महापौरांना धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि महापौरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुंबईच्या पहिल्या नागरिक असणाऱ्या महापौरांना असे धमकीचे पत्र येत असेल तर त्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडली आहे, हे दिसून येते. पूजा राठोड यांना तर गृहमंत्री न्याय देऊ शकले नाहीत. या प्रकरणाविषयी तरी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी भाजपच्या वतीने केली आहे.
किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास होणार आहे.