विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर दिल आहे. आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला. यावेळी त्यांनी कोरोनाचा धोका सामान्य माणसांपेक्षा तळीरामांनाच असतो, असं म्हणत टोलेबाजी केली.
“कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छा असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकेचे बाण सोडले. त्यांनी संजय गायकवाड यांच्यासह नवाब मलिक, नाना पटोले, हसन मुश्रीफ यांच्यावरही जोरदार फटकेबाजी केली. “नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीनं कारवाई केल्यामुळे ते केंद्रावर पिसाळल्यासारखे आरोप करतात. हसन मुश्रीफ काही माधुरी दीक्षित किंवा ट्रम्प नाहीत, त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणी ओळखत नाही. पियुष गोयलांवर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे,” असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण
ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग
रडत बाजीराव आणि चाय-बिस्कुटी प्रचार
रेमडेसिवीर पुरवठादारांना ठाकरे सरकारचाच त्रास! आधी धमकी, मग पोलीसांनी उचलले
नाना पटोलेंनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “नाना पटोलेंच्या टीकेला काय उत्तर द्यायचं? जसे केंद्रात एक पप्पू आहेत तसे हे इथले पप्पू आहेत. त्यामुळे आम्ही राहुल गांधींच्या टीकेलाही उत्तर देत नाही आणि नाना पटोलेंच्याही.”