मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही, तो राज्याचाच विषय आहे असे मत उदयनराजे भोसले यांनी मांडले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्राकडे बोट दाखवत जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ठाकरे सरकार धडपडत असतानाच उदयनराजे भोसले यांनी मात्र मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला ठणकावले आहे. राज्य सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप उदयनराजे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात टिकवायला अपयशी ठरले. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरवले आहे. तेव्हापासूनच ठाकरे सरकार आरक्षणाच्या जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न करत हा विषय केंद्रावर ढकलण्यासाठी खटाटोप करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील इतर मंत्री मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार देऊ शकते, तो केंद्राचा विषय आहे, असे सांगत असतानाच उदयनराजे भोसले यांनी मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले.
हे ही वाचा:
चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम
वेळ मारून नेणाऱ्यांचे तोंडावर आपटणे नेहमीचेच
पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल
महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे
आरक्षण हा राज्याचा विषय आहे, तो केंद्राचा विषय नाही असे म्हणत सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असे भोसले यांनी सांगितले. तर राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन बोलवावे अशी मागणी त्यांनी केली. त्यासोबतच मराठा असो की इतर कोणीही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करावे असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.
रविवार, ६ जून रोजी उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे संभाजी छत्रपती यांना पाठिंबाही दिला. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत असे उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.