मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हिंगोलीमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मराठा संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार,उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या प्रतिमेला आंदोलकांकडून जोडे मारण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निकाल देताना हे आरक्षण घटनाबाह्य ठरवले. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडायला कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्याचे म्हटले जात आहे. यावरूनच आता राज्यातील मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा समाजाची आक्रमक संघटना अशी ओळख असलेल्या मराठा शिवसैनिक संघटनेने यासंबंधी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शनिवार १५ मे रोजी हिंगोलीतील गांधी चौक येथे मराठा शिवसैनिक संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन पुकारले. यावेळी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिमांना जोड्या मारण्यात आले. राज्यात एकीकडे लॉकडाऊन सुरु असताना सारे निर्बंध झुगारून हे आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा:

राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा

इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

कोणत्याही कल्पनेशिवाय अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची ही थोडी धावपळ झाली. पण प्रतिबंधात्मक कारवाई करताना पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे, पप्पू चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे.

Exit mobile version