मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा उपोषण स्थगित करून सरकारला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना कारण देत म्हटलं की, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे हे उपोषण करण्यासाठी बसले होते. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. “मला रात्री हात पाय धरुन सलाईन लावण्यात आले. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्हीही पाहिजे. पण मला जर असंच सलाईन लावत असतील, तर दुपारी उपोषण स्थगित करु. कारण सलाईन लावल्याने उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळे गावातील ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार,” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली.
हे ही वाचा:
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का
बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित
पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !
आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक
तसेच त्यांनी येत्या १३ ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिला असून सरकारने सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. “येत्या १३ ऑगस्टपर्यंत सरकारला पुन्हा वेळ देतो. १३ ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्या. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती ओढण्यासाठी आता मला तयारी करायची आहे. त्यामुळे मी सलाईन लावून उपोषण करणार नाही. सलाईन न लावता उपोषण करू दिले तरच उपोषण सुरू ठेवणार,” अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगे हे पुन्हा राज्य दौरा सुरु करणार आहेत. येत्या ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यात दौरा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.