मराठा आंदोलनाविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी उपचारांची तयारी दाखविली असून मराठा समाजाला मात्र त्यांनी साखळी उपोषण करण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. परंतु, अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा, तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुर्तास उपोषण मागे घेत माघार घेतल्याचे बोलले जात आहे. मराठा आंदोलनाची दिशा नव्याने ठरवण्यासाठी हे पाऊलं असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे यांनी सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस उपचार घेणार असून त्यानंतर पुढचा दौरा घोषित करणार अशी माहिती त्यांनी दिली.
संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झाले आहेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, अशा सूचनाही जरांगे यांनी दिल्या आहेत. मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे ते म्हणाले. गावागावत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींना विरोध करू नये
दरम्यान, रविवारी मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे म्हटले होते. ते मुंबईच्या दिशेने निघालेही होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांची धरपकड करत संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द करत पुन्हा अंतरवाली सराटी गाठले होते. भाजपा नेत्यांनीही मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र डागले होते.