ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि नेत्या मनिषा कायंदे यांनी रविवार, १८ जून रोजी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनिषा कायंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटातील कामगिरीवर खंत व्यक्त केली.
“मी २०१२ मध्ये बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेनेत प्रवेश केला. आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे हे खरं आहे. एकनाथ शिंदेंकडे अधिकृत शिवसेना आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्षबदल केलेला नाही”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
“माझा राजकीय प्रवास खूप मोठा आहे. मी २५ वर्षं भाजपात काम केलं. सर्वात आधी मी मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केलं होत. नारायणराव आठवले मध्य दक्षिण विभागातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर मनोहर जोशी, विद्यमान खासदारांच्या दोन टर्म असा पूर्ण काळ होता. त्यामुळे मी जरी भाजपात होते, तरी निवडणुकीच्या वेळी मी सातत्याने शिवसेनेचंच काम केलं. शिवसेनेची व भाजपाची विचारधारा समसमानच होती. त्यामुळे भाजपातून शिवसेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
“उद्धव ठाकरे यांनी मला संभाजीनगरचं महिला संपर्क प्रमुख केलं. विदर्भातही दोन जिल्हे दिले. पण त्यानंतर माझ्यासारख्या सीनियर व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर एखादी ज्युनिअर व्यक्ती तिथे आली. ही ज्युनिअर व्यक्ती मला डिक्टेट करायची. याबाबत मी पक्षातील नेत्यांशी बोलले. पण दुर्लक्ष केलं गेलं. माझी ती खंत होती,” असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं. मात्र, त्यामुळे त्यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर टीका केल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतील वेगळ्या विचारधारा न पटण्यासारख्या होत्या. पण शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशांचं पालन केलं. जुन्या- जाणत्या शिवसैनिकांना महाविकास आघाडी पसंत नव्हती. उद्धव ठाकरेंनी ज्यांना ज्यांना पक्ष संघटनेसाठी जवळ केलं, त्याचं प्रवक्ता म्हणून समर्थन करणं कठीण जात होतं,” असं म्हणत मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या व्हॉट्सऍप निर्बंधांमुळे तालिबानी सरकार चालवणे बनले मुश्किल!
‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’
आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले
‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!
“पक्ष कार्यकर्त्यांना मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे. पक्षात कुचंबना झाल्यावर मीडियात छुप्या पद्धतीने बोललं जातं. माझी अडचण मी सर्व नेत्यांना सांगितली. पण, कुणी ऐकलं नाही. विधान परिषदेचे माझे दोन वर्ष बाकी आहेत. महिला आघाडीचं काम द्या. मी काम मागत होते? पक्षातील लोक सोडून जात असताना काम करण्याची संधी मागत होतो. ती दिली नाही,” असं म्हणत मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.