दारु घोटाळ्यामुळे तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशाला पत्र लिहून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. दारु घोटाळ्याबद्दल अटक केली असली तरी आपण कसे शिक्षणाविषयी संवेदनशील आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सिसोदिया यांनी पत्रातून केला आहे.
ते लिहितात की, आम्ही मुलांना शिक्षण देण्याचे राजकारण करत आहोत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एवढाच गुन्हा आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय उभा करत आहेत. त्यामुळे केजरीवाल सरकारचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. तुरुंगाचे राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे. पण भारताचे भविष्य हे शिक्षणाच्या राजकारणात आहे. जर संपूर्ण देशात शिक्षणाच्या बाबतीत राजकारण झाले सते तर सगळ्या मुलांसाठी विकसित शाळा तयार झाल्या असत्या.
सिसोदिया लिहितात की, नेत्यांना तुरुंगात टाकून जर राजकारणात यश मिळत असेल तर शाळा चालविण्याच्या राजकारणात कुणालाही रस असण्याची गरज नाही. मुलांसाठी शाळा कॉलेज उघडण्यापेक्षा सरकारविरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकणे सोपे आहे. शिक्षणाचे राजकारण राष्ट्रीय स्तरावर पोहोचले तर तुरुंगाच्या राजकारणावर आपोआपच फुली मारली जाईल.
हे ही वाचा:
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन
नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती
अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार
या संपूर्ण पत्रात आम आदमी पक्षाच्या शिक्षणविषयक धोरणाचे कौतुक करत आपण कसे फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करत होतो, याचा घोष करण्यात आला आहे.
सत्तेच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. उत्तर प्रदेशात एका लोकगायिकेचे गाणे आपल्या विरोधात असल्याचे कळल्यानंतर तिथल्या सत्ताधाऱ्यांनी तिला नोटीस पाठवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने पंतप्रधानांबाबत काही शब्दप्रयोग केल्यावर त्याला अपराधी असल्याप्रमाणे ताब्यात घेण्यात आले.
शिक्षणाचे राजकारण करणे सोपे नाही. शिक्षणासाठी मुले, त्यांचे आईवडील तसेच शिक्षकांना प्रेरित करणे हे दीर्घकाळ चालणारे काम आहे. एखाद्याला तुरुंगात टाकताना मात्र तपास यंत्रणेकडून कुणावर दबाव टाकला की काम होते. शिक्षणाच्या वाटचालीत असे करता येत नाही.
महाराष्ट्रात खासदार संजय राऊत तुरुंगात असताना त्यांनी आईला पत्र लिहून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न आता सिसोदिया यांनीही केला आहे.