मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच, या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने दखल घेतली आहे. ‘या घटनेने माझे हृदय पिळवटले आहे. संतापाचा कडेलोट होतो आहे. मणिपूरमधील घटना ही कोणत्याही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे एकिकडे, मात्र या घटनेमुळे संपूर्ण देशाची बदनामी होत आहे. १४० कोटी देशवासींना लज्जित व्हावे लागले आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, माता-बहिणींच्या रक्षणासाठी त्यांनी कठोरात कठोर पावले उचलावी,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
‘आपल्या राज्यांत कायदा सुव्यवस्था आणखी मजबूत करा. घटना राजस्थानची असो, छत्तीसगढची असो वा मणिपूरची. आपण राजकीय विवादाला बाजूला सारून कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सन्मानाचा निर्धार केला पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराला मोकळे सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे झाले आहे, त्यांना कधीच माफ केले जाणार नाही,’ असे पंतप्रधान म्हणाले.
मणिपूरचा हा वादग्रस्त व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सरकारनेदेखील मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यास संमती दिली आहे.
हे ही वाचा:
इर्शाळवाडी दुर्घटना: मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचे ऑन फिल्ड उपस्थित राहून लक्ष
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट
मणिपूरमधील क्रूरता; दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार
बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू
मुख्यमंत्र्यांकडूनही कठोर कारवाईचे संकेत
मणिपूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच, या प्रकरणात पहिली अटक झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा अजून तपास सुरू असून यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.