देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण यापैकी मणिपुर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मणिपूर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये होणाऱ्या मतदानाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मणिपूर राज्यातील मतदान हे दोन टप्प्यात पार पडणार होते. त्यापैकी मतदानाचा पहिला टप्पा २७ फेब्रुवारी रोजी होणार होता. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे ३ मार्च रोजी घेतले जाणार होते. पण त्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला असून आता निवडणुकीचा पहिला टप्पा २८ फेब्रुवारी रोजी पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ मार्चला मतदान देण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाचे एक पथक ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी मणिपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, राज्यातील प्रशासकीय कर्मचारी, राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्त, वेगवेगळ्या जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी, आसाम रायफल्सचे अधिकारी या सर्वांसोबत या पथकाने बैठक आणि चर्चा केली.
या सर्व चर्चेनंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी यासंबंधीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.