माणिक सहांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

माणिक सहांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

भारतीय जनता पार्टीचे नेते माणिक सहा यांनी आज त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी माणिक सहा यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. रविवार, १५ मे रोजी त्रिपुरातील राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

भारतीय जनता पार्टीने शनिवार, १४ मे रोजी त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलब देब यांचा राजीनामा घेत सगळ्यांनाच धक्का दिला. तेव्हापासूनच त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटातर्फे माणिक सहा यांना विधिमंडळे गटाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे माणिक सहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले. त्यानुसारच आज सहा यांचा शपथविधी पार पडला.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा विसर

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

माणिक सहा यांना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. २०१८ मध्ये सुरु झालेल्या त्रिपुराच्या विकासाच्या प्रवासात ते आपले जोशपूर्ण योगदान देतील असा विश्वास पंतप्रधांनांनी व्यक्त केला आहे.

माणिक सहा हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य आहेत. फेब्रुवारी महिन्यातच त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. तर २०२० पासून ते भाजपचे त्रिपुरा राज्याचे अध्यक्ष देखील आहेत. २०१६ साली माणिक सहा हे कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले. माणिक सहा हे पेशाने डेंटिस्ट असून ते त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापनही करत होते. तर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणूनही ते कामकाज पाहत आहेत.

Exit mobile version