भाजपाच्या शिष्टमंडळाने केली पोलिस आयुक्तांकडे मागणी
गुढी पाडवा, राम नवमी आणि डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परवानगी तसेच लाऊड स्पीकरवर अजान बंद करण्याची मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे. मंगळवारी हे शिष्टमंडळ संध्याकाळी संजय पांडे यांना आयुक्तालयात भेटले.
आपल्या या मागणीचे पत्रक त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आणि गुढी पाडवा, राम नवमी, आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याची मागणी केली. कार्यक्रमांच्या परवानगी संदर्भात स्पष्ट असे आदेश नसल्यामुळे तशी परवानगी मिळावी, अशी मागणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून करण्यात आली. मशिदींवर बसवलेल्या लाऊड स्पीकरवरून देण्यात येणारी अजान बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. या शिष्टमंडळात मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर, आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.
मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही मागणी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर ही कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले आहेत. या मागणीसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून, ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन मोहीम हाती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पाच लाख लोकांनी केला गृहप्रवेश
कोकणातील रिफायनरी…शिवसेना ताकाला जाऊन भांड का लपवतेय?
मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!
सणसमारंभांबाबत परवानगीची स्पष्टता नसल्यामुळे आमदार आशीष शेलार यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. राम जन्माला देखील मिरवणुका निघतात, पण यांच्या परवानगीची स्पष्टता नसल्याचे आशिष शेलारांनी म्हटले. मुंबई तर १० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत सरळ जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याचे कारण असे दिले आहे की, आतंकवादी हे ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहेत. त्यांच्याकडे ही माहिती असेलही खरं काय ते माहित नाही, असे शेलार म्हणाले आहेत.