मंदाकिनी खडसे ईडी समोर आज राहणार हजर

मंदाकिनी खडसे ईडी समोर आज राहणार हजर

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. एकनाथ खडसे यांचा जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी अटक करण्यात आल्यावर खडसे यांचीही ईडीने चौकशी केली होती. तेव्हाच खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र, तेव्हा त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.

‘ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला होता. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला होता. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी वापरलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’ने तपास सुरू केला होता. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी खडसे यांना राजीनामाही द्यावा लागला होता.

हे ही वाचा:

दोन डोस घ्या, आरटीपीसीआर करा आणि मगच अधिवेशनाला या!

किशनने पेलला धावांचा गोवर्धन

म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा

कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

संबंधित प्रकरणामध्ये मंदाकिनी खडसे यांचे नाव पुढे आल्यावर ईडीकडून त्यांना समन्स पाठवण्यात आला होता. मात्र, त्या तब्येतीचे कारण देऊन चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. तसेच त्यांनी १४ दिवसांची वेळही मागितली होती. त्यानंतर ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार मंदाकिनी खडसे आज पुण्याच्या जमीन खरेदी प्रकरणी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version