ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजपासून तीन दिवसांसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुंबईत त्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची भेट घेणार नाहीत. अलीकडेच त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. विरोधी पक्षाचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांनाच करायचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्या काँग्रेसपासून दूर आहेत.

तसेच १ डिसेंबरला त्या मुंबईमध्ये काही उद्योगपतींचीही त्या भेट घेणार आहेत. तसेच त्यांना पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभाग घेण्यासाठी आमंत्रण देणार आहेत.

ममता बॅनर्जी यांचा हा मुंबई दौरा राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. ममता बनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी तयारीसाठीचे हे दौरे म्हणजे त्यांचे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली होती. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असेही घोष म्हणाले. ‘एबीपी माझा’ने सुत्रांच्या हवालाने दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला आहे.

हे ही वाचा:

पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ

‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान

संसदेतही टीएमसी काँग्रेसपासून दूरच आहे. २९ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला टीएमसीने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे दीदींच्या मनात काहीतरी मोठी योजना चित्रे स्पष्ट झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्तरावर पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी सध्या त्या त्यांच्या रणनीतीवर काम करत आहेत.

Exit mobile version