पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपा आज उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. कालच भाजपाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधून ममता बॅनर्जींच्या विरोधात सुवेंदू अधिकारींना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुवेंदू अधिकारींनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. “ममता बॅनर्जींना ५० हजार मतांनी निवडणुकीत हरवले नाही तर राजकारण सोडीन.” अशी घोषणा सुवेंदू अधिकारी यांनी केली होती.
हे ही पाहा:
ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षातून सुवेंदू अधिकारी यांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला. सुवेंदू अधिकारी हे मेदिनीपूर भागातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा प्रभाव हा मेदिनीपूर आणि त्या भोवतालच्या ३०-४० विधानसभा मतदार संघांवर आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारींच्या भाजपामध्ये जाण्याने ममता बॅनर्जींना मोठा फटका बसला आहे. २०१९ लोकसभेच्या निकालांप्रमाणे पश्चिम बंगालच्या १२२ विधानसभा मतदार संघांवर भाजपा आघाडीवर होती. पश्चिम बंगाल विधानसभेत १४५ हा बहुमताचा आकडा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मेदिनीपूरच्या या जागांवर ममताच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठी आघाडी होती. ज्याचे श्रेय सुवेंदू अधिकारींना दिले जाते.