राष्ट्रीय नेतृत्व म्हणून स्वतःला पुढे करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका वक्तव्यामुळे आता चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमातील भाषणात त्यांनी चक्क सरकारी जाहिराती हव्या असतील तर सरकारबद्दल सकारात्मक बातम्या द्या, असे विधान केले आहे.
एक स्थानिक पत्रकार शुक्ला गांगुली यांनी ममता यांना प्रश्न विचारला की, आमच्या वर्तमानपत्राला जाहिराती मिळत नसल्यामुळे आम्हाला आर्थिक चणचण जाणवत आहे. गेली ११ वर्षे आम्ही वर्तमानपत्र चालवत आहोत पण आमच्यासह अनेक वर्तमानपत्रे सध्या संकटाच्या गर्तेत आहेत. सरकारकडून आम्हाला जाहिराती मिळत नाहीत. तुम्ही यात लक्ष घालावे.
या पत्रकाराचा प्रश्न ऐकल्यानंतर ममता उत्तरल्या की, ग्रामीण भागातील जी वर्तमानपत्रे सरकारचे काम सकारात्मक पद्धतीने मांडतील त्यांनी जाहिराती मिळतील. मी त्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आदेशही देणार आहे. कारण प्रत्येकवेळेला सरकार प्रसिद्धीसाठी आपल्या यंत्रणेचा वापर करू शकत नाही.
ममता म्हणाल्या की, आज आम्ही राज्याच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करत आहोत. पण मोठ मोठ्या वाहिन्यांनी केवळ एकदाच ही बातमी दाखविली. पण ग्रामीण वर्तमानपत्रांनी ही बातमी सविस्तर दाखवावी आणि लोकांकडे या योजना पोहोचतील याची काळजी घ्यावी. अशा वर्तमानपत्रांची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी मी जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. त्यांना तुम्ही तुमच्या वर्तमानपत्राची प्रत पाठवावी.
हे ही वाचा:
शिवसेनेची यूपीएच्या दिशेने फरफट
शिवसेनेचे यूपीएच्या दिशेने पहिले पाऊल
राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब
विंटर ऑलिम्पिकवर अमेरिकेचा बहिष्कार
याबद्दल ममता पुढे म्हणतात की, ही प्रत पाठविण्याची का आवश्यकता आहे कारण जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे तपासले जाईल की, तुम्ही दिलेली बातमी ही सकारात्मक आहे की नकारात्मक. जे अधिकाधिक सकारात्मक बातम्या देतील त्यांना जाहिराती मिळतील. कारण मला असे वाटते की, या कार्याची दखल घेतली जावी, त्याला सकारात्मक प्रसिद्धी मिळाली. त्यासाठी नकारात्मक बातम्या सकारात्मक करा. बंगालमध्ये आम्ही केवळ नकारात्मक बातम्या पाहात आहोत. सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रित केले जात नाहीए.