भवानीपूरमधून ममतांनी पळ काढला

भवानीपूरमधून ममतांनी पळ काढला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाने आज पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैकी २९१ जागांवर उमेदवार घोषित केले. यामध्ये ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून निवडणूक लढवणार असून भवानीपूरमध्ये सोभनदीप चट्टोपाध्याय हे निवडणूक लढवणार आहेत.

ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदार संघाला भाजपाने लक्ष्य केलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी डिसेंबर महिन्यात बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यावर असताना त्यांनी भवानीपूर मतदारसंघालाही भेट दिली होती. भवानीपूर मतदारसंघामधील लोकसंख्येचे बदलते गणित लक्षात घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची संख्या ही ५०-६० टक्क्यांच्या जवळपास आहे. ममता बॅनर्जी या गेली अनेक वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष करून गृहमंत्री अमित शाह यांना गुजराती असल्यामुळे ‘बाहरी’ असल्याचे ठरवत आहेत. अशावेळी गुजराती आणि मारवाडी मतदार बहुसंख्य असलेल्या मतदार संघातून निवडणूक लढवणे ममता बॅनर्जींना योग्य वाटले नाही यात काही नवीन नाही.

हे ही वाचा:

बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?

या उलट नंदीग्राममधील जवळपास सर्व मतदार हे बंगाली असून त्यातही २५-३० टक्के मतदार हे मुसलमान आहेत. त्यामुळे नंदिग्रामची जमीन ममता बॅनर्जींना पोषक वाटली नसती तरच नवल होतं. शिवाय ममता बॅनर्जींचे जुने सहकारी आणि आता भाजपामध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम ज्या मेदिनीपूर भागात आहे, तेथील मोठे नेते मानले जातात. म्हणूनच थेट सुवेंदू अधिकारींना आव्हान देण्यासाठीही ममता बॅनर्जींनी नंदीग्राम मतदारसंघ निवडला आहे.

Exit mobile version