पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यात छापे टाकल्यानंतर २४ तासांनंतर ईडीने आज, सकाळी माजी शिक्षण मंत्री आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता यांना अटक केली आहे. ईडीच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून २० कोटी रुपये रोख, २० मोबाईल फोन, सोन्यासह परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. २४ तासांहून अधिक काळ या दोघांच्या घरांची सखोल झडती सुरू होती.
दोन सरकारी साक्षीदारांसमोर अटकेची कागदपत्रे स्वाक्षरी केल्यानंतर ईडीच्या पथकाने पार्थला निजाम पॅलेस येथील सीबीआयच्या प्रादेशिक मुख्यालयात नेले. पार्थ चॅटर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास मित्र मानले जातात. १९९८ मध्ये तृणमूलच्या स्थापनेपासून ते सोबत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक वेळी त्यांना मंत्री करण्यात आले आहे. सध्या ते उद्योगमंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री आहेत.
शुक्रवार, २२ जुलैला सकाळी सात-आठ सीबीआय अधिकाऱ्यांनी पार्थ चॅटर्जी यांच्या नकताळा येथील घरीही भेट दिली. त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी रात्रीपर्यंत पार्थ यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे बोलले जात आहे. ईडीने शुक्रवारी रात्री ८ वाजता टोलीगंज येथील दुसर्या निवासी संकुलातील फ्लॅटमधील पार्थची जवळची सहकारी अर्पिता चॅटर्जी हिच्या घरातून रोख, २० मोबाईल फोन, सोने आणि २० कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. ईडीचे आणखी एक अधिकारी पार्थ चॅटर्जीच्या घरी पोहोचले. पार्थ आणि अर्पिताच्या घरांव्यतिरिक्त, ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश चंद्र अधिकारी आणि एसएससी सल्लागार समितीचे सदस्य आणि तथाकथित मध्यस्थ चंदन मंडल यांच्या घरावरही छापे टाकले आहेत.
हे ही वाचा:
अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती
“नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली”
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
या घोटाळ्यात शिक्षक नियुक्तीच्या पॅनेलची मुदत संपत असतानाही बेकायदेशीरपणे सल्लागार समिती स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे. बेकायदेशीरपणे रिक्त पदे निर्माण करण्यात आली. अशा लोकांना या पदांवर शिक्षक नियुक्त केले गेले, ज्यांनी एकतर परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्णही झाले नाहीत.