इंडिया गटाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत

नीतीश कुमार यांना संयोजक करण्यावर होणार चर्चा

इंडिया गटाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी इंडिया गटाच्या आज, शनिवारी होणाऱ्या आभासी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. ‘या बैठकीची माहिती आयत्या वेळी देण्यात आली. मात्र त्यांचा एक कार्यक्रम आधीच ठरला होता,’ असे तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले. तर, अन्य एका नेत्याने ‘याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही भविष्यातील इंडिया गटाच्या बैठकीत सहभागी होणार नाही,’ अशी सारवासारव केली आहे. ‘आम्ही संयमीपणा आणि दयाळूपणा दाखवू,’ अशी टिप्पणी त्याने केली.

ममता बॅनर्जी यांनी आधीच पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत जागावाटप करण्यास नकार दिला आहे. तर, त्यांच्या अटी-शर्तींवर त्या काँग्रेसशी जुळवून घेण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी इंडिया आघाडीची आभासी बैठक होत आहे. यावेळी भाजपविरोधात आघाडी मजबूत होण्यासह जागावाटपावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत एक संयोजक बनवण्यावर विचारविनिमय केला जाईल. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या संपर्कात आहेत.

हे ही वाचा:

निवृत्त होईपर्यंत आठवड्याला ८० ते ९० तास काम करायचे नारायणमूर्ती

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

कर्नाटक: वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या संयोजकाच्या रूपात नीतीशकुमार आणि अध्यक्षाच्या रूपात मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती व्हावी, यासाठी जनता दल (संयुक्त) प्रयत्नशील आहे. मात्र यासाठी काँग्रेस तितकीशी उत्सुक नाही. ममता यांनी याआधी इंडिया गटाचे प्रमुख म्हणून खर्गे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. याचे समर्थन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही केले होते. या पार्श्वभूमीवर नीतीश कुमार यांना संयोजक करण्यासाठी ममता बॅनर्जी यांची परवानगी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version