तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवार, ३० नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात दाखल झाल्या असून त्यांचा भेटींचा आणि बैठकांचा सिलसिला सुरू आहे. बुधवार, १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवारांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड असे नेतेही उपस्थित होते. तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ ही चर्चा झाली. दरम्यान या भेटीच्या वेळी त्यांनी शरद पवार यांना रवींद्रनाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेली एक फोटो फ्रेम भेट दिली आहे.
हे ही वाचा:
‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’
मोदींची स्तुती केली म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठाने परत मागितली पीएचडी! विद्यार्थ्याचा आरोप
राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू
‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’
या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पर्याय देण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि बंगाल यांचे विशेष नाते असल्याचे सांगितले. तर काँग्रेस असो अथवा इतर कोणताही पक्ष जे जे भाजपा विरोधात आहेत त्यांचे स्वागत आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
या आधी दुपारी ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार यांच्याशी संवाद साधला यावेळी भाजपाला हरवण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर यावेळी ‘विदेशात राहून राजकारण करता येत नाही’ असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.