31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणलेडी जिन्नापासून बंगालला वाचवा!

लेडी जिन्नापासून बंगालला वाचवा!

Google News Follow

Related

बंगालची निवडणूक झाल्यावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी जो काही हिंसक हैदोस घातला तो लोकशाहीला काळिमा फासणारा होता. राजरोसपणे हिंदूंना मारण्यात आलं. या आधी बंगालमध्ये मुहम्मद अली जिन्ना यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिमांनी डायरेक्ट ऍक्शन पुकारुन हिंदूंचा अनन्वित छळ केला होता, आई-बहिणींची अब्रू लुटली, बकऱ्या कापतात त्याप्रमाणे हिंदू पुरुषांना कापून काढलं, बालकांवरही दया दाखवण्यात आली नाही. ममता दिदी काय वेगळं करतेय म्हणा? या न्यायाने ममता दिदीला लेडी जिन्ना म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही! स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या फाळणीची जी काही मुख्य कारणे ठरली त्यातील मुस्लीम तुष्टीकरण हे एक महत्वाचं कारण होतं, ज्यामुळे त्यांच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होऊन एका वेगळ्या देशाच्या मागणीपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला होता. त्या प्रवासाचे मुख्य संचालक, जनक मोहम्मद अली जिन्ना यांना मानले जाते. बंगालमध्ये आज जे घडतंय ते पाहता, विलगीकरणाची भावना निर्माण करण्याची तयारी लेडी जिन्ना म्हणजेच ममता दीदींकडून करण्यात येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!

विद्रूप राजकारणाचा रक्तरंजित प्रयोग

डाव्यांच्या हातातून बंगाल हिसकावून घेतल्यानंतर ममता दिदी उत्तम शासन करतील अशी अपेक्षा सर्वांनाचं होती. परंतु ममता दिदी तर डाव्यांपेक्षाही भयानक निघाली. ममता दिदीने रक्तरंजित खेळ सुरू केला. तिला कळलं की हिंदूंची मते विभागलेली आहेत. पण मुस्लिमांची मते एकगठ्ठा मिळतात. म्हणून तिने आपलं लक्ष मुस्लिमांवर केंद्रित केलं आणि त्यांना जितकं आक्रमक होता येईल तितकं होऊ दिलं. आता नुकत्याच लागलेल्या बंगालच्या निकालातून आपल्याला हेच समजलं की मुस्लिमांनी दिदीला भरघोस मतदान केलेलं आहे. परंतु हिंदूंची मते मात्र विभागली गेली आहेत आणि याचा राजकीय फटका भाजपाला बसला. निवडणूक सुरू असताना एका युट्यूब चॅनेलवर (ज्या चर्चेत मराठी पत्रकार भाऊ तोरसेकर सुद्धा सहभागी झाले होते), एका पत्रकाराने सांगितलं की, निवडणूक झाल्यावर बंगालमध्ये प्रचंड हिंसा होणार आहे. जर दिदी जिंकली तर टीएमसीचे गुंड उघडपणे दंगली करतील आणि दिदी हरली तर लोकांमध्ये असंतोष पसरवून एकमेकांशी लढायला लावतील. निवडणूक झाल्यानंतर तेच घडलं, भारताच्या दुर्दैवाने दिदीने ही निवडणूक जिंकली आणि तिने आपलं विद्रूप रूप दाखवलं. भाजपाचं कार्यालय जाळून टाकण्यात आलं, हिंदूंना मारहाण करण्यात आली. या हिंसेला घाबरून अंदाजे १ लाख लोकांनी आसाममध्ये पलायन केल्याची बातमी आली आहे. याविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये महिलांसोबत यौन शोषण करण्यात आल्याचा आरोप देखील लावण्यात आला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “हिंसेला घाबरुन बंगालच्या लोकांनी असं पलायन करणे हा एक गंभीर मुद्दा आहे. या लोकांना दयनीय परिस्थितीत राहण्यास सक्ती केली जात आहे. संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकाराचं हे उल्लंघन आहे.”, असं कोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणजेच ही बाब किती गंभीर आहे, हे आपल्याला कळतं.

हे ही वाचा:

दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

चंद्रपूरनंतर ‘या’ जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार

सराईत गुन्हेगार महिलेला धाडसी अधिकाऱ्याने रेल्वे अपघातातून वाचवले

मुख्यमंत्री पुरस्कृत अराजकता

नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयने टीएमसीचे मंत्री फिरहाद हकीम, मंत्री सुब्रत बॅनर्जी, आमदार मदन मित्रा यांना अटक केल्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी सीबीआय कार्यालयासमोर प्रदर्शन केलं. स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे ६ तास बसून होत्या. ममता दिदीने सीबीआयला आव्हान दिलं की, त्यांनी मला अटक करावी. या दरम्यान ममता दिदीच्या गुंडांनी सीबीआय कार्यालयावर तुफान दगडफेक केली. दगडफेकीसह बाटल्या आणि इतर सामान सुद्धा फेकून मारले. या दगडफेकीनंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्विट केलं की, सीबीआय कार्यालयाबाहेर दगडफेक केली जातेय, परंतु कोलकात्ता पोलिस मूकदर्शक बनली आहे. हे प्रकरण लवकर हाताळण्याचे अपील त्यांनी केली. माननीय राज्यपाल म्हणाले की, “ही अराजकता आहे, पोलिस आणि प्रशासन शांत राहून केवळ पाहतेय. ममता दिदी आपल्या गुंडांना तर आवर घालत नाहीतच, त्यांचे नेते कल्याण बॅनर्जी राज्यपालांनाचं धमक्या देतं आहेत.” त्यावर कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की त्यांच्या विरोधात आम्ही आपराधिक केस दाखल करु शकत नाही. आम्ही लोकांना अपील करतो, की त्यांनी राज्यपालांविरोधात केस दाखल करावी, कारण राज्यपाल हिंसा आणि अपराधाला खतपाणी घालत आहेत.” ते पुढे म्हणाले की, “२०२४ नंतर भाजपाचे अनेक नेते जेलमध्ये जातील.” यावर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, “He is senior functionary @AITCofficial @MamataOfficial. He is senior parliamentarian @LokSabhaSectt. He is senior advocate @barcouncilindia @barandbench. Just stunned but leave the matter to sound discretion of cultured people of West Bengal and media @PTI_News @IndEditorsGuild” आता मला सांगा, बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का? ममता दिदी बंगालची मालक असल्यासारखी वागत आहे. टीएमसीच्या गुंडांचा उद्रेक पाहून तर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. “बंगालमध्ये कायदा मोडत असतील, तर ममता बॅनर्जीसह त्यांच्या मंत्र्यांविरोधात सीबीआयला त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मोकळीक आहे.” हे सगळं प्रकरण पाहता बंगाल भयानकतेच्या दारात उभा आहे, हे स्पष्ट आहे. भारतातील सर्वसामान्य लोकं ममता दिदीवर नाराज आहेत. ममता दिदी लोकशाहीचा गळा दाबत आहे, अशी चर्चा भारतभर सुरू आहे.

टीएमसी शासनातील हिंसेचा इतिहास

एकेकाळी गुरू रविंद्रनाथ ठाकूर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने ओळखला जाणारा बंगाल आज दंगलखोरांचं माहेर घर म्हणून ओळखला जात आहे. बंगालमध्ये दिदीच्या राज्यातील ही हिंसा काही नवीन नाही. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोनुसार २०१३ मध्ये राजकीय आतंकवादामुळे २६ लोकांची हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये १३१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या, यात १८४ जणांना हिंसेचा सामना करावा लागला. २०१६ मध्ये बंगालमध्ये राजकीय आतंकवादाच्या ९१ घटना घडल्या, ज्यामध्ये २०५ लोकं हिंसेचे बळी ठरले. बंगालमध्ये चांगले उद्योग-धंदे नाहीत, शेतीतून जास्त फायदा होत नाही, म्हणून बेरोगजगार युवक राजकीय पक्षांकडे आकर्षित होतात आणि हिंसाचाराला बळी पडतात!, हे बंगालचं सध्याचं विद्रूप चित्र आहे. डाव्यांच्या राज्यात ज्या हिंसा व्हायच्या त्या लपून छपून व्हायच्या, परंतु ममतांचे गुंड मात्र उघडपणे हल्ले करत आहेत. एवढंच नव्हे तर दिदीच्या राज्यात धार्मिक दंगलींना ऊत आलेला आहे. २०१६ साली धूलागढमध्ये धार्मिक दंगल उसळली, अनेक घरं उध्वस्त करण्यात आली होती. २०१३ साली झालेल्या नलियाखाली दंगलीत २०० पेक्षा जास्त हिंदूंची घरे जाळून टाकण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे केवळ घरांचं नव्हे, तर मंदिरांचंही नुकसान करण्यात आलं होतं. जे पत्रकार या दंगलीचे वार्तांकन करायल गेले होते, त्यांना स्थानिक प्रशासनाने काम करू दिले नाही. कॅमेरे बंद करण्यात आले, तीन महिने कुणालाही तिथे फिरकू दिलं नाही. ज्या हिंदूंवर अत्याचार झाले, त्यांना आजही न्याय मिळालेला नाही. गुजरात दंगलीचा पाढा गिरवणार्‍या स्वतःला बळजबरीने पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पत्रकारांनी किंवा विचारवंतांनी या दंगलीचा साधा उच्चारही केला नाही आणि ममता दिदी मात्र अशा अनेक धार्मिक दंगली, हत्याकांड, राजकीय हिंसा पचवून समाधानाने ढेकर देत आहे.

गीत रामायणामध्ये ग. दि. माडगूळकरांनी कैकेयीचं “माता न तू, वैरिणी” अशा शब्दात वर्णन केलंय. बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांकडे पाहून, याचं गीताचा आधार घेऊन ममता दिदीचं वर्णन, “दिदी न तू, भक्षिणी” अशा शब्दांत कोणी केलं, तर गैर ठरणार नाही. दिदीचं वर्णन ग. दि. माडगूळकरांच्या शैलीत करायचं झालं तर,

 

“भारतभूची नव्हेस कन्या, नव्हेस आमुची ताई

जाळपोळ नि हिंसा तू, सांग का करतेस बाई?

छळ हिंदूंचा करील मूढे, बहिणाई का कुणी?

दिदी न तू, भक्षिणी… दिदी न तू, भक्षिणी…”

 

आपल्या भारतीय संस्कृतीत दिदी या शब्दाला खूप महत्त्व आहे. दिदी म्हणजे मोठी बहिण… मोठी बहिण कोण असते? जी लहान भावंडांवर मुलांप्रमाणे प्रेम करते, त्यांचं पालन-पोषण करते. इतिहासात अशी एक दिदी होऊन गेली आहे. तिचा आणि बंगालचा संबंध सुद्धा आहे. त्या दिदीचं नाव आहे भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांची शिष्या… लंडनमधील सर्व सुख-सुविधा सोडून ही दिदी भारतात आली आणि तिने भारतीय लोकांची सेवा केली, तिने आपलं सर्वस्व पणाला लावलं. पण दुसरीकडे ही दिदी आहे, जीचं नाव ममता आहे, परंतु ममतेचा लवलेशही तिच्यात नाही! उलट दिदी या पवित्र शब्दाला काळिमा फासण्याचे कृत्य या स्त्रीकडून होतं आहे. स्त्रीचा आदर करावा हे आपल्या संस्कृतीने शिकवलं आहे. दिदी स्त्री आहे, म्हणून दिदीवर टिका करताना मलाही त्रास होतोय! परंतु आता मात्र नाईलाज आहे. या राक्षसी कृत्याविरोधात उभं ठाकलंचं पाहिजे!

कथित पुरोगाम्यांचे स्युडो सेक्युलरिजम

निवडणुकीनंतर आजही किंवा त्यापूर्वी झालेल्या हिंसाचाराविरोधात एकाही पुरोगाम्याने तोंडातून शब्द सुद्धा उच्चारलेला नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय लालकृष्ण अडवाणींनी स्युडो सेक्युलरिजम म्हणजे छद्म धर्मनिरपेक्षता असा शब्द उच्चारला होता, तो किती समर्पक आहे, हे या घटना पाहिल्यावर आपल्याला कळतं. ममता दिदी स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेते, आपण चंडिपाठ करतो असंही म्हणते पण तिच्या समोर निरपराध हिंदूंचा छळ होताना, मात्र ही दिदी आपले डोळे मिटून राजकीय मलईयुक्त दूध पित बसलीय. आज दिदीला घाबरुन भाजपात आलेले काही लोकं पुन्हा टीएमसीमध्ये जात आहेत. बंगालमध्ये दिदीच्या विरोधात निवडणूक लढवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. पण हे मृत्यूचं आमंत्रण स्वीकारून अनेक लोकं भाजपात सहभागी झाले. सामान्य जनतेने भाजपाला भरघोस प्रतिसाद दिला. आता या प्रतिसादाचं कटू फळ मात्र त्यांना भोगावं लागत आहे. ममता दिदी शासक म्हणून पूर्णपणे नापास ठरलेली आहे. पण तिच्या विजयामागचं खरं कारण मुस्लिम तुष्टीकरण आणि हिंदूंच्या मनातील भीती हेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं संघटन केलं आणि देशद्रोही लोकांना धडा शिकवला, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. स्वराज्य स्थापन केलं! पण भारताला गद्दारीचा शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी उत्तम शासन केलं, पण गद्दारीमुळे ते पकडले गेले आणि औरंगजेबाने इस्लामी मान्यतेनुसार संभाजी महाराजांचा छळ करुन हत्या केली. हिंदू योद्धा पृथ्वीराज चौहान महम्मद घोरीशी दोन हात करतं होते, तेव्हा जयचंद घोरीला मिळाला, त्याने पृथ्वीराजांसोबत गद्दारी केली, त्यामुळे पृथ्वीराजांची हत्या झाली. आता भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी संपूर्ण भारतात एकात्मतेचं वातावरण निर्माण करत असताना काही राज्यांतील जयचंद, त्यांना पाडण्यासाठी सरसावले आहेत. भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काश्मिरमधून ३७० आणि ३५(ए) काढून भारत एकसंध केला. तीन तलाक, आता सीएए आणि एनआरसी… पुढे अजूनही देशहिताचे निर्णय ते अवश्य घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. परंतु ममता बॅनर्जी मात्र जयचंद बनून दंगलखोर देशद्रोह्यांची साथ देते आहे. एवढंच नाही, तर स्वतःच्या पक्षातील लोकांना दंगलखोर बनवून बंगाली तरुणांचं आयुष्य उध्वस्त करतेय.

संवैधानिक लोकशाहीच्या दीर्घकालीन हितासाठी….

एक ना एक दिवस ममता दिदीची सत्ता जाईलचं, असा माझा ठाम विश्वास आहे. कारण कंस कितीही उपद्रवी झाला, तरी कृष्ण कधी ना कधी सूड उगवतोचं! काळरात्र झाल्यानंतर आयुष्याची मशाल पुन्हा पेटतेचं. तशाप्रकारे ममता दिदीचा हा अहंकार नक्कीच गळून पडेल. दिदीने लोकशाहीची कितीही हत्या केली तरी आम्ही तिच्या विरोधात लोकशाही आणि संवैधानिक पद्धतीने लढा सुरुच ठेवणार आहोत. आमच्यामध्ये छत्रपतींचं रक्त सळसळतंय, आमच्यामध्ये सावरकरांचं रक्त सळसळतंय… त्यांनी मोठ्या निर्दयी सत्तेविरोधात लढा दिला. तर ही दिदी कोण आहे? आम्ही या दिदीचा अहंकार पाडून दाखवूचं, तेही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सनदशीर मार्गाने… आज जर आपण दिदीच्या राक्षसी सत्तेविरोधात एकत्र नाही आलो, तर पुढे भारताची शकले उडतील. इतिहासाची पुनरावृत्ती होईल, लेडी जिन्ना भारताची पुन्हा एकदा फाळणी करु शकेल. बंगालमध्ये किती तरी बांग्लादेशी मुस्लिम अवैधरित्या राहत आहेत. बंगालचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी भारतातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय की, दिदीच्या जुलमी सत्तेविरोधात आपण एकत्र येऊया आणि संवैधानिक मार्गाने प्रतिकार करुन दिदीला धडा शिकवूया… हे जर आता रोखलं नाही, तर हे लोण वाढत जाईल आणि पुढे लोकशाही धोक्यात येईल. म्हणून लोकशाहीच्या हितासाठी, संविधानाच्या दीर्घकालीन रक्षणासाठी मी राष्ट्रपतींना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी देखील जातीने लक्ष द्यावं आणि देशविरोधी, लोकशाहीला मारक असलेल्या बंगालमधील सत्ताधारी पक्षाने पुरस्कृत असलेल्या आतंकवादावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

(लेखक हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा