४० जागा तरी जिंकता येतील का? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केला प्रहार

बंगालमधील सभेत साधला निशाणा

४० जागा तरी जिंकता येतील का? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केला प्रहार

इंडी आघाडीचे सदस्य असलेल्या ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यात दिवसेंदिवस अंतर वाढत चालले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील की नाही, हे माहीत नाही, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर हल्ला केला. त्या म्हणाल्या की, आपण इंडी आघाडीत आहोत तरी तुम्ही बंगालमध्ये न्याय यात्रा घेऊन आलात. कसला आहे हा अहंकार? काँग्रेस, तुम्हाला ३०० पैकी ४० जागा तरी जिंकता येतील की नाही, माहीत नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर वाराणशीत भाजपाला पराभूत करून दाखवा. जिथे आधी तुम्ही जिंकत होतात, तिथे आता तुम्हाला पराभव स्वीकारावा लागत आहे.

हे ही वाचा:

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

आम्ही उत्तर प्रदेशात जिंकलो नाही तुम्ही राजस्थानात जिंकला नाहीत. जा आणि प्रथम तिथे जिंकून या. तुमच्यात किती हिंमत आहे ती पाहूया. अलाहाबादमध्ये जिंकून दाखवा. वाराणशी जिंकून दाखवा. तुमचा पक्ष किती हिंमतवान आहे ते पाहूया. राहुल गांधी यांनी बंगालमधील भारत जोडतो न्याय यात्रेदरम्यान विडी कामगारांशी संवाद साधला. त्यावरून ममता यांनी काँग्रेसवर प्रहार केला. त्या म्हणाल्या की, आता एक नवी स्टाइल आली आहे. फोटो शूट करण्याची. जे कधी चहाच्या टपरीवर गेले नाहीत ते आज विडी कामगारांशी संवाद साधत आहेत. हे सगळे स्थलांतर करणारे पक्षी आहेत.

काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर राहुल गांधींचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी हे महिला विडी कामगारांशी संवाद साधत आहेत. त्यांचा व्यवसाय, त्यातून मिळणारे उत्पन्न यावर ते चर्चा करताना दिसत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी त्यांनी लोकसभेच्या दोन जागा काँग्रेसला ऑफर केल्या होत्या. त्यावरून काँग्रेसचे बंगालमधील नेते अधीर रंजन चौधरी यांनी संतापून म्हटले होते की, आम्हाला ही भीक नको. ममता यांचे म्हणणे होते की, २०१९च्या लोकसभा तसेच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे लोकसभेसाठी जागावाटप व्हायला हवे.

Exit mobile version